कोल्हापूर: घरची परिस्थिती चांगली, पुण्यात स्वतःचा हक्काचा फ्लॅट आणि मुलेही उच्चशिक्षित... अशा हायफाय प्रोफाईल असलेल्या एका महिलेबाबत धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गावाकडे जात असल्याचे घरी सांगून ही महिला अक्कलकोट, इस्लामपूर, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर अशा विविध शहरांतील गर्दीच्या बसस्थानकांवर पोहोचायची. यानंतर ती असं काही कांड करायची, जे तुम्हालाही हादरवून टाकेल. ही महिला बसस्थानकांवर महिलांचे दागिने ओरबाडणारी अट्टल चोरटी निघाली. कोल्हापूरच्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरात दोन महिलांची सोन्याची मंगळसूत्रे अत्यंत शिताफीने लांबवणार्या या महिला आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पुण्यातून बेड्या ठोकल्या आहेत. या धडक कारवाईमुळे आंतरजिल्हा बसस्थानकांवर धुमाकूळ घालणार्या या महिलेचा पर्दाफाश झाला आहे.
एसटी बसमध्ये चढताना साधला डाव
मिळालेल्या माहितीनुसार, २४ मे रोजी कोल्हापूरच्या सीबीएस बसस्थानकावर प्रचंड गर्दी होती. एसटी बसमध्ये चढण्याच्या गडबडीत दोन महिला प्रवाशांच्या गळ्यातील सोन्याची मंगळसूत्रे अचानक गायब झाली. गर्दीचा
फायदा घेत कोणीतरी हातसफाई केल्याचे लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली होती. या चोरीच्या गुन्ह्याचा समांतर तपास थेट कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपवण्यात आला होता.
एलसीबीच्या पथकाने बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत थेट पुण्यातून सविता अवताडे हिला ताब्यात घेतले. पोलिसांनी जेव्हा तिची कसून चौकशी केली, तेव्हा तिने चोरी केल्याची धक्कादायक कबुली दिली. पोलिसांनी तिच्याकडून २ लाख ८९ हजार ८०० रुपये किमतीची दोन्ही चोरलेली सोन्याची मंगळसूत्रे जप्त केली आहेत. जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. ही महिला इतर कोणत्या टोळीशी जोडलेली आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.